सोनपेठ : तालुक्यात ३९ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू आहे. सदस्य, सरपंचपद हे केवळ मानाचे नाही तर कामाचे पद झाले आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ३९ ग्रा.पं. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा १०० टक्के निधी जिल्हा परिषदांना मिळत होता. त्यामुळे कामाचे नियोजन खर्च जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत होते. मागील १५ वर्षांत धोरणे बदलत गेल्याने वित्त आयोगाकडून येणारा १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. १५ व्या वित्त आयोगाची ८० टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. २०२०-२१ या वर्षात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सद्य:स्थितीत या ग्रामपंचायतींचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, उमेदवार व पॅनलप्रमुख प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत आहेत.
थेट निधी मिळत असल्याने ग्रा.पं. निवडणुकीला महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:42 AM