पाथरी (परभणी ) : दुष्काळामुळे बहुतांश पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीची समस्या गंभीर बनली आहे. पाण्याअभावी तालुक्यातील 500 एकरवरील केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना उभ्या बागा मोडण्याशिवाय आता पर्याय नाही. यामुळे जवळपास 20 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
तालुक्यात या वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 2 महिन्यापासून तर दुष्काळ अधिकच तीव्र झाला आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी न सुटल्याने तर या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णतः कोरडे पडले आहेत. गोदावरी नदीच्या बंधाऱ्यातील पाणी आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातील पाणी यावरच या भागात बारमाही शेती अवलंबून आहे. पाणी नसल्याने आता अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बागायती केळी पीक अक्षरशः नेस्तनाबूत झाले आहे. संपूर्ण केळी बागा जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केला तर २० कोटींचे नुकसान यातून झाले आहे.
सर्वच क्षेत्र बाधितकेळी पिकाला बारमाही पाणी लागते. मात्र, या बागा दुष्काळात सापडल्या आहेत. तालुक्यात कृषी विभागाच्या अवहालानुसार 500 एकर केळी लागवड आहे. पाण्याअभावी शेतातील उभे केळीचे पीक करपून जात आहे सर्वच क्षेत्रावरील केळी बाग जळून गेल्या आहेत. यामुळे या बागा मोडण्याशिवाय शिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्याय नाही.