- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : दुष्काळी परिस्थिती मुळे बागायती शेती पूर्णतः हातची गेली आहे, केळीच्या बागा जळून जात आहेत, उसाचे फड करपून जाऊ लागले आहेत, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. आता तर कासापुरी येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी वाळून जात असलेल्या तुतीच्या बागेवर नांगर फिरवला आहे. तालुक्यातील संपूर्ण रेशीम शेतीच अडचणीत आली आहे. शासनाच्या मनरेगा योजनेचा लाभ मिळवण्यास होणाऱ्या अडचणी या मुळे ही रेशीम उधोग बाळसे धरण्यापूर्वीच मोडीस निघत आहे.
पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिके हातची गेली आहेत. गावोगावी ऊस,केळी, पपईच्या बागा करपल्या आहेत. दरवर्षी दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शासनाच्या म नरेगा योजनेत रेशीम शेतीच्या तुती लागवडीसाठी शासनाने समावेश केला खरा मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होताना दिसत नाही. बोरगव्हान या एकमेव गावात मनरेगा अंतर्गत तुती लागवड आहे इतर गावात काही शेतकरी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम शेती करू लागले आहेत. मात्र, या वर्षी दुष्काळाने पाण्या अभावी तुतीच्या बागा ही जळून जाऊ लागल्या आहेत.कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांच्या गट न. 175 मध्ये असलेल्या 2 एकर तुतीच्या शेतीला पाणी कमी पडत असल्याने बाग जळू लागली आहे. पाण्या अभावी त्यांना अर्धा एकर तुतीच्या बागेवर नांगर फिरवावा लागला आहे.
प्रशासकीय उदासिनताशासनाने मनरेगा योजने अंतर्गत तुती लागवडी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान जाहीर केले मात्र तहसील कार्यालयातील यंत्रणा यासाठी आडकाठी बनत असल्याने शेतकरी योजनेपासून दूर जाऊ लागले आहेत.