परभणी : कोविडच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने आता मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला असून, परभणीत दहा वाहनांच्या साह्याने मालवाहतूक केली जात आहे.
२३ मार्चपासून एसटी महामंडळाच्या बस फेऱ्या बंद होत्या. त्यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील व्यवहार सुरळीत झाले असून झाले असून, एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार एका बसमधून केवळ २२ प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. परिणामी बसफेऱ्या मधूनही महामंडळाला हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी आता मालवाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातून १० मालवाहतूक करणाऱ्या गाड्या एसटी महामंडळाच्या परभणी विभागांमध्ये सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या वाहनांच्या सह्याने अकोला, वसई, हिंगोली आदी ठिकाणी मालवाहतूक करण्यात आली. लवकरच आणखी १० बसेस परभणी विभागात मालवाहतूक करण्यासाठी दाखल होतील, अशी माहिती महामंडळाच्यावतीने देण्यात आली.