परभणी : स्थानिक गुन्हा शाखा पथकाला शहरात गस्त घालताना गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव फाटा येथे एका इसमाकडे गावठी पिस्टल आणि दोन मॅग्झीन आढळून आले. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध परभणी ग्रामीण ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली.
स्थानिक गुन्हा शाखेचे पथक अवैध व्यवसायाच्या बाबत माहिती काढून गस्त घालत होते. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आवेज गफारखान पठाण (२३, रा.नेहरू चौक, गंगाखेड) हा परभणीत येत असल्याची माहिती समजली. त्याच्याजवळ गावठी पिस्टल आणि दोन मॅग्झीन असा ५३ हजारांचा मुद्देमाल ब्राम्हणगाव फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतला. सदरील पिस्टल, दोन मॅग्झीन बाळगण्याची शासनाची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे ताब्यात बाळगताना मिळून आला. सदरची पिस्टल व साहित्य त्याने पालम येथे राहणाऱ्या एका इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर पठाण, रवी कुमार जाधव, शेख रफीयोद्दिन, निलेश परसोडे यांनी केली.