परभणी : २०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २ हजार ९७६ हेक्टरवर भूईमुगाची तर २९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी रबी हंगामामध्ये सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांकडून पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई ंआदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून शेतकर्यांना जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगले उत्पन्नही मिळत आहे.
यावर्षी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांसह नदी-नाल्यांना बर्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्वांचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उन्हाळी हंगामासाठी ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यामध्ये भूईमूग या पिकासाठी ४ हजार ८१०, सूर्यफूलासाठी ४३० व मकासाठी २८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी २२ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावर भूईमुगाची तर २९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी शेतकर्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी हंगामात ६० टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
अशी झाली भुईमूग पेरणीउन्हाळी हंगामामध्ये परभणी तालुुक्यात भूईमूग या पिकासाठी १ हजार १३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार १७९ हेक्टवर पेरणी झाली आहे. गंगाखेड ५३० पैकी ४५ हेक्टर क्षेत्रावर, पाथरी ५२० पैकी ८०, जिंतूर २७० पैकी ६०७, पूर्णा ७९० पैकी ७५, पालम ३५० पैकी १८, सेलू १७० पैकी ११०, सोनपेठ ५३० पैकी ३० तर मानवत तालुक्यात ५२० हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ८३२ हेक्टर क्षेत्रावर भूूईमुगाची पेरणी करण्यात आली.
उपलब्ध पाण्याचा शेतकर्यांना होणार फायदाजिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, डिग्रस बंधारा, मुदगल, मुळी, ढालेगाव या प्रकल्पांबरोबरच जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. निम्न दुधना व जायकवाडी प्रकल्पामधून आतापर्यंत २ ते ३ पाणी पाळ्या जिल्ह्यातील पिकांसाठी सोडण्यासाठी सोडण्यात आल्या. या पाण्याचा रबी हंगामातील पिकांना चांगला फायदा झाला. यानंतर जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणार्या पाण्याचा उन्हाळी हंगामातील पिकांनाही लाभ होणार आहे. त्यामुळे या हंगामातही शेतकर्यांना चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे.
सूर्यफुलाकडे शेतकर्यांनी फिरविली पाठकृषी विभागाच्या वतीने यावर्षीच्या उन्हाळी हंगामामध्ये भूईमूग, मका या पिकांबरोबरच सूर्यफूल या पिकासाठी ३४० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. यासाठी परभणी तालुक्यासाठी १०० हेक्टर, गंगाखेड १०, पाथरी ४०, जिंतूर १०, पूर्णा ६०, पालम १०, सेलू १०, सोनपेठ ५० तर मानवत तालुक्यासाठी ५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु, २२ फेब्रुवारीपर्यंत एकाही तालुक्यात शेतकर्यांनी सूर्यफूल पिकाची पेरणी केली नाही. त्यामुळे सूर्यफूल पिकाच्या पेरणीकडे जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.