लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या समस्यांना वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकी १७ शेतकऱ्यांना शासकीय मदत नाकारण्यात आली असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे.
शेती निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस अधिक झाला तरी नुकसान आणि पावसाने पाठ फिरवली तरीही नुकसान. त्यामुळे या व्यवसायात नुकसान अधिक आणि नफा कमी, अशी परिस्थती मागील काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेवर पेरणी करायची, घरातील पैसा जमवून शेतीत गुंतवणूक करायची. सुरुवातीचे काही दिवस पीक जोमात येते. परंतु, एकाच संकटात होत्याचे नव्हते होते आणि नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वारंवार होणारी नापिकी, त्यातून बँकांकडील कर्जाचा वाढलेला डोंगर या चिंतेने ग्रासलेल्या अनेक शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.
मागील वर्षात कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. या नव्या संकटाने जिल्हावासीय भयभीत असले तरी शेतीसमाेरील समस्या संपलेल्या नव्हत्या. या काळातही जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषाला पात्र ठरल्याने या शेतकरी कुटुंबियांना प्रतिकुटूंब १ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, दुसरीकडे १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत. दोन प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबियांचे मोठे हाल होतात. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद होऊन मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा अनेक समस्या समोर उभ्या राहतात. अशाही परिस्थितीत धीर धरत अनेक कुटुंबियांनी स्वत:ला सावरले आहे.
तीन महिन्यात १८ प्रकरणे
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मागील वर्षी १२ महिन्यांमध्ये ६४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. मात्र, यावर्षीच्या अडीच महिन्यांतच १८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
आत्महत्या केलेल्या या प्रकरणांपैकी ५ प्रकरणे पात्र ठरली असून, १३ प्रकरणांची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.
जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्येची ६ प्रकरणे झाली होती. त्यापैकी ४ प्रकरणे पात्र ठरली असून, २ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यातील १ प्रकरण पात्र ठरले असून, ३ प्रकरणात चौकशी सुरू आहे. तर १ ते १४ मार्च या काळात ८ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यांची चौकशी सुरू आहे.