खड्डे बुजवि्ल्याने समाधान
परभणी : शहरातील देशमुख हॉटेल भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये डांबर मिश्रीत गिट्टी टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील खड्ड्यांचा त्रास कमी झाला आहे. देशमुख हॉटेल ते सुपर मार्केट, देशमुख हॉटेल ते वसमत रोड आणि लोकमान्यनगर ते युसूफ कॉलनी या रस्त्यावरील खड्डे बुजविल्याने वाहनधारकांचा त्रास कमी झाला आहे.
नागरिकांची वाढली गर्दी
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. त्यामुळे कामानिमित्त या भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारातच प्रशासकीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या भागात फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छता मोहिमेला खो
परभणी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी अनेक भागात स्वच्छता कर्मचारी पोहचत नाहीत. त्यामुळे परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. या मोहिमेत मनपाने स्वच्छतेचे नियोजन करावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
गतिरोधक टाकण्याची मागणी
परभणी : बसस्थानक ते रेल्वेस्थानक हा वाहतुकीचा प्रमुख रस्ता असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. याच दरम्यान, रेल्वेस्थानकाजवळ एसटी. बसेस थांबविल्या जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर ऑटोरिक्षा चालक ऑटोरिक्षा उभ्या करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर रेल्वेस्थानक परिसरात गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.
पोलीस ठाण्यात वाहने पडून
परभणी : येथील चारही पोलीस ठाण्यांच्या आवारात विविध गुन्ह्यांमधील वाहने पडून आहेत. काही वाहने जप्त करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. एकाच जागी पडून असलेल्या वाहनांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या वाहनांचा त्वरित लिलाव केल्यास वाहनांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निधी उपलब्ध होऊ शकतो.