परभणी : माझी आजी आणि मागील पिढीतील लोक बोलताना म्हणी, वाक्प्रचारांचा वापर करीत असत. त्यांच्याकडे भाषेचे संचित होते, अनुभव होते, म्हणूनच भाषेच्या बाबतीत अगोदरच्या पिढ्या समृद्ध होत्या, असे प्रतिपादन लेखक प्रसाद कुमठेकर यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कवी प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. आसाराम लोमटे, प्रा. भारत काळे, मसापच्या अध्यक्षा सरोजताई देशपांडे, बाबा कोटंबे, प्रा. भगवान काळे आदींची उपस्थिती होती. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात लेखिका वीणा गवाणकर यांची विशेष उपस्थिती होती. या ऑनलाइन कार्यक्रमात प्रसाद कुमठेकर यांनी ‘मला काय दिसतं, मला काय ऐकू येतं’ या विषयावर मनोगत व्यक्त केले.
कुमठेकर म्हणाले, भाषेच्या बाबतीत आजी समृद्ध होती. आम्ही कंगाल आहोत. आजीकडे संचित होते, अनुभव होते. आपण माहितीचे डस्टबिन झालोय. भाषेचे, संवादाचे महत्त्व कमी होत चालले आहे, असेही ते म्हणाले. मराठी भाषेत उत्पत्ती कोश, चरित्र कोश, वाङ्मय कोश असे विविध कोश निर्माण झाले आहेत. यामध्ये मराठी भाषेचा दुसरा क्रमांक लागतो; परंतु इंटरनेट आणि गुगल मॅपच्या जमान्यामध्ये संवाद कमी झाला आहे. भाषा कमी झाली. शब्द हरवत चाललेत. सर्व जण एकाच भाषेत बोलताहेत. परिसरातील बोलणं, बघणं, ऐकणं कमी होत चाललंय. त्यामुळं भाषा मरत चाललीय. कमी होत चाललीय, असे सांगून भाषा वाढवायची असेल, जगवायची असेल, तर श्रम व श्रमकऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. तरच भाषा समृद्ध होईल, असे कुमठेकर म्हणाले. प्रा. सखाराम कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भगवान काळे यांनी आभार मानले.