कोरोनाचा सामना करणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्य तेलाचे दरही दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले. सोयाबीन तेलाचे १५ किलोचे दर हे २ हजार ६४० रुपयांवर जावून पोहोचले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हेच दर आता २ हजार ४०० रुपयांवर येऊन पोहोचले आहेत तर दुसरीकडे १८५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे शेंगदाणा तेल परभणीच्या बाजारपेठेत १७० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री झाले. १४८ रुपये प्रतिकिलोने विकणारे पाम तेल १४० रुपये किलोवर आले आहे.
२२० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे करडईचे तेल २० रुपये प्रतिकिलो कमी झाले आहे. २ हजार ६८० रुपयांनी सूर्यफूल तेलाची विक्री होणारी कॅन २ हजार ५५० रुपयांवर येऊन पेाहोचली आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त होत आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असून, सर्वसामान्यांचे बजेटही सावरले आहे. पावसाळ्यात चमचमीत खाण्याचे दिवस आले असून, खाद्यतेलाच्या स्वस्ताईने त्यात पुन्हा भर पडली आहे.
काही वर्षांमध्ये करडईचे उत्पादन घेऊन बोरी येथील घाण्यातून तेल काढून आणत होतो. हे तेल वर्षभर पुरायचे; मात्र आता करडईच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून करडईचे उत्पादन घेणे बंद केले आहे. परिणामी, बाजारपेठेतून दर महिन्याला सोयाबीनचे तेल खरेदी करावे लागत आहे.
- लक्ष्मण वैद्य, शेतकरी.
परभणी तालुका व परिसरातील तेल काढण्याचे घाणे बंद झाले आहेत. तेलासाठी आवश्यक शेतीमाल उत्पादित करताना शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतेही बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशाेधित केले नाही. त्यामुळे तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेणे बंद केले आहे.
- नरसिंग ठेंबरे, शेतकरी
शेंगदाणा, सूर्यफूल उत्पादन घटले
तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलाबरोबरच करडईचे उत्पादन गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घटले आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्हा व परिसरातील तेल उद्योगही बंद पडले आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलाचे दर नियंत्रणात येऊ शकतात.
राज्य शासन व कृषी विभागाने तेल वर्गीय पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांसाठी कोणतेही व्हिजन सध्या तरी कृषी विभागाकडे दिसून येत नाही.