गंगाखेड : तालुक्यातील १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ८ लाख ३० क्विंटल रासायनिक खताचा वापर केला आहे. खरीप हंगामात विक्री झालेल्या रासायनिक खताची नोंद पंचायत समितीच्या कृषी विभागात झाली आहे. एक एकर शेतात सरासरी पाच क्विंटल रासायनिक खताचा वापर झाल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड तालुक्यात १ लाख ४५ हजार हेक्टर शेती आहे. यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८ लाख ३० हजार क्विंटल खताची खरेदी केली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक खताची विक्री झाली आहे, असे दिसून येत आहे. यामध्ये २ लाख ५० हजार क्विंटल युरिया, १ लाख २० हजार क्विंटल डीएपी, ४० हजार क्विंटल एमओपी व इतर ४ लाख ६० हजार असे एकूण ८ लाख ३० हजार क्विंटल खत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांसाठी वापरले आहे. दरम्यान, एकीकडे राज्य शासन व सामाजिक संस्था रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे कल द्यावा, असे आवाहन करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे गंगाखेड तालुकावासीयांनी एकट्या खरीप हंगामात १ लाख ४५ हजार हेक्टर ८ लाख ३० क्विंटल रासायनिक खताची खरेदी करून एका एकरामध्ये सरासरी पाच क्विंटल रासायनिक खताचा वापर केला आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे. गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रासायनिक खताचा अती वापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडून पर्यावरणास हानीकारक ठरत आहे. त्यामुळे सेंद्रिय खताच्या वापरासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ती जनजागृती करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी चेतन लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
सासस