शहराची लोकसंख्या तीन लाख ५५ हजार १६९ एवढी आहे. त्यापैकी १८ वर्षांच्या पुढील दोन लाख ६२ हजार ८२६ नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्या शहरात दहा केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जानेवारी ते ऑगस्टअखेरपर्यंत शहरातील एक लाख १७ हजार १४८ जणांचे लसीकरण झाले आहे. आणखी एक लाख ४५ हजार ६७८ जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरात १६ केंद्र होते. लसीचा पुरवठा त्यावेळी वेळेवर व मुबलक होत नसल्याने हे केंद्र कमी करण्यात आले. आता लसीचा पुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच मनपाने मागणी केल्यास लस पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. मात्र, मनपाला उपलब्ध करून दिलेली लस किमान ४ ते ५ दिवसांपर्यंत संपत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे सरासरी दिवसाला एक हजारच्या आत लसीकरण होत आहे. हीच स्थिती राहिल्यास संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्यास अजून ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
१ सप्टेंबरचा शहरातील अहवाल
झालेले लसीकरण - एक लाख १७ हजार १४८
पहिला डोस - ७६ हजार ५८५
दुसरा डोस - ४० हजार ५६५
लसीकरणाची टक्केवारी : ४४.५७
शिल्लक राहिलेले लसीकरण : एक लाख ४५ हजार ६७८
३१ ऑगस्टला दिलेले डोस अजूनही शिल्लक
आरोग्य विभागाने मनपाच्या मागणीप्रमाणे ३१ ऑगस्ट रोजी लसींचा पुरवठा मनपाला केला. ४ सप्टेंबरअखेरपर्यंत याच साठ्यातून लसीकरण सुरू होते. यात कोविशिल्डचे सात हजार ५००, तर कोव्हॅक्सिनचे ५०० डोस मनपाला दिले होते. मनपाकडे लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात असताना दिवसाला केवळ ८०० ते ९०० नागरिकांचेच लसीकरण होत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी दिलेली लस अद्यापही मनपाकडून संपलेली नाही.
आयुक्तांकडून बैठका, आवाहन
मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी गुरुवारी शहरातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. लसीकरणाच्या मोहिमेत शिक्षकांनी सहभाग वाढवावा आणि जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे यासाठी शिक्षकांनी काम करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच मनपा हद्दीतील सहा शाळांमध्येही रविवारपासून केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्न केले आहेत. केंद्र वाढविल्यानंतर लसीकरणाला गती मिळेल, अशी मनपाला आशा आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत आयुक्त पवार यांनी केले.
फोनला प्रतिसाद नाही
शहरातील लसीकरणाची संख्या वाढत नसल्याने व लसीचा साठा शिल्लक राहत असल्याबाबत आयुक्त देवीदास पवार यांना शनिवारी सायंकाळी ४.१० वाजता फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मनपाची बाजू समजू शकली नाही.
..तर लागतील १४५ दिवस
शहरात सध्या सुमारे एक हजार नागरिकांचे दररोज लसीकरण होत आहे. या गतीने लसीकरण झाल्यास अपेक्षित लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी किमान १४५ दिवस लागतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.