मागच्या आठवड्यात तालुक्यातील एका गरोदर मातेला माळरानातील चिखलाचा रस्ता तुडवत ३ किलोमीटर पायी चालत यावे, लागले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा आवाक झाला होता. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊ, असे आश्वासनही दिले होते. अजूनही त्या घटनेची चर्चा सुरूच असताना याच गावातील पार्वतीबाई महादू ढाकरे या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला शुक्रवारी रात्री झोपेत असताना अर्धांगवायूचा झटका आला. परंतु, दोन दिवस सारखा पाऊस सुरू असल्याने गावात वाहन येणे शक्य नव्हते. त्यामुळे उपचारासाठी उशीर झाला होता. तरीही गावातील खासगी जीपचालक भीमराव ढाकरे यांनी मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन गाडी चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर येथे पोहोचवले केले. तेथून पुढे सुलतानपूर (जि.बुलडाणा) येथे खासगी दवाखाना गाठला. परंतु, तिथे पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने डॉक्टरांनी या महिलेचा मेंदू काळा पडल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा परतीचा प्रवास करून पार्वतीबाईला गावी आणावे लागले. या अवस्थेतच दि. ११ जुलै रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एका आठवड्यातील दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेने घेतला वृद्ध महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:20 AM