परभणी : जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचा ५ वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे या फेडरेशनची नियमानुसार निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी विविध संस्थांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.
जिल्ह्यातील विविध मजूर सहकारी संस्थांनी या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाचा कालवधी काही महिन्यांपूर्वी संपला आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये या संदर्भात झालेल्या निवडणुकीत अनियमितता झाली होती. तसेच संचालक मंडळाने उपविधी क्रमांक १ ते १५ ची अंमलबजावणी केली नाही. सभासद सहकारी संस्थांना विविध खात्यांकडून कामे मिळूनही त्यामध्ये अनेक अनियमितता झाली. कालावधी संपला असतानाही संचालक मंडळ कार्यरत असणे चुकीचे आहे. त्यामुळे या फेडरेशनची तातडीने निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आसेगाव येथील भगवती मजूर सहकारी संस्था, परभणी येथील सत्यवचनी मजूर सहकारी संस्था,सिद्धेश्वर मजूर सहकारी संस्था भोसी, श्रीकृष्ण मजूर सहकारी संस्था सावळी, सवेरा मजूर सहकारी संस्था सेलू, लाल बहादूर शास्त्री मजूर सहकारी संस्था सेलू आदी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.