जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. नामांकन भरण्याच्या दिवसापासून निवडणुका असलेल्या गावागावांत राजकीय हालचालींना चांगलीच गती आल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या १३ हजार ६३ उमेदवारांनी तहसील कार्यालयात येऊन अर्ज भरले आहेत. त्यातील १२ हजार ८६० अर्ज पात्र ठरले असून, १४५ अर्ज बाद झाले आहेत. आता हे उमेदवार तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे चिन्हांबाबत माहिती विचारत आहेत. त्यामुळे प्रत्येक तहसील कार्यालयाने दर्शनी भागावर चिन्हांची यादी लावली आहे. या यादीजवळ थांबून चिन्हावर नजर फिरवत हे चिन्ह योग्य राहील का? असा कयास उमदेवार व पॅनलप्रमुखांकडून बांधला जात आहे.
अशी आहेत चिन्ह
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट,कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली.nफलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर यांचा चिन्हांचा सामवेश आहे.
मतदारांना चिन्ह पटवून देताना उमेदवार व पॅनलप्रमुखांची होणार कसरत
जिल्ह्यात ५६६ ग्रामंपचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १२ हजार ८६० अर्ज पात्र ठरले असले तरी ४ जानेवारीनंतरच ग्रा.पं. निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांना यावर्षी १९० चिन्हे उपलब्ध करून दिली असली तरी या चिन्हांमधून उमेदवारांना चिन्हे निवडावी लागणार आहेत.
जी चिन्हे निवडली जाणार आहेत. त्यात एका पॅनलसाठी किमान ३ चिन्हांचा समावेश असणार आहे. त्यामुळे ही चिन्हे मतदारांना पटवून देताना उमेदवार व पॅनलप्रमुखांची कसरत होणार आहे.
आकर्षक चिन्हे मिळवण्यासाठी धडपड
जिल्ह्यातील ९ तहसील कार्यलायाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी दर्शनी भागात चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार व पॅनलप्रमुख या चिन्हांच्या यादीजवळ थांबून चिन्हांवर नजर फिरवत हे चिन्हा चांगले राहील का? अशी अपसात चर्चा करताचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. आकर्षक चिन्ह मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.