परभणी : यंदाची परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही जातीय समीकरणात गुरफटल्याचे चित्र दिसले. प्रारंभी बाहेरचा उमेदवार या मुद्यावर लढवली जाणारी निवडणूक कधी ओबीसी, धनगर-हटकर आणि मराठा, मुस्लीम या जातीय समीकरणात विखुरली गेल्याने विकासाच्या मुद्याचे तीनतेरा वाजले.
उद्धवसेना वगळता इतर प्रचलित राजकीय पक्ष यंदाच्या निवडणुकीत दिसले नाही. उमेदवारांना जातीय चेहरा देऊन ओबीसीविरुद्ध मराठा असा सत्ता संघर्ष पुढे आणण्यात आल्याने पूर्ण निवडणूक त्याअनुषंगाने फिरल्याचे दिसून आले. त्यातच गत दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा शुक्रवारी झालेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने तो कोणाला मारक ठरणार, यावर आता तर्कवितर्क लावले जात आहे.
परभणी मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ६२.२६ टक्के मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यात सर्वाधिक ६४.२७ टक्के मतदान पाथरी विधानसभा मतदारसंघात झाले. उमेदवारांसह राजकीय पुढाऱ्यांसह प्रशासनाने मोठा गाजावाजा करूनसुद्धा या गत दोन निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का साधारण दीड ते दोन टक्क्याने कमी झाल्याने राजकीय पक्षांसह प्रशासन चिंतेत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने आपल्या कोट्यातील जागा देत रासपकडून महादेव जानकर यांना उद्धवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्याविरुद्ध मैदानात आणले. प्रारंभी बाहेरचा उमेदवार म्हणून मतदारांनी त्या दृष्टीने बघितले. मात्र, हळूहळू या राजकीय आखाड्यात जातीय रंग भरला गेल्याने निवडणूक चुरशीची होत गेली. जानकरांच्या बाजूने ओबीसी धनगर-हटकर यासह इतर समूह तर जाधवांच्या बाजूने मराठा, मुस्लीम यासह इतर समाजाचे पाठबळ दिसून आले.
परभणी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करता प्रत्येकी तीन विधानसभा क्षेत्र युती आणि आघाडीतील आमदारांच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही लढत तुल्यबळ होईल, असे चित्र निवडणुकीच्या मध्यावर पुढे आले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मात्र विकासकामांऐवजी फक्त जातीय समीकरणे जोडण्यातच उमेदवारांसह नेत्यांचा वेळ खर्ची पडला. जिल्ह्यासह राज्य पातळीवरील वरिष्ठ पुढाऱ्यांनी यात धन्यता मानल्याचे दिसून आले. त्यामुळे मराठा प्राबल्य असलेल्या पाथरी मतदारसंघात आणि ओबीसी, धनगर-हटकर समाजाचे वर्चस्व असलेल्या गंगाखेडमध्ये सर्वाधिक मतदान झाले. पण, युती आणि आघाडी दोन्ही बाजूंनी विजयाचे गणित मांडले जात असले तरी मतदारांनी नेमकी कोणती भूमिका घेतली हे ४ जूनलाच समोर येईल.
मुस्लीम, अल्पसंख्यांक मते निर्णायकया निवडणुकीत मतदानाचा टक्का ६५ टक्के पार होईल, असे वाटत होते. परंतु, अपेक्षितरित्या मतदान न झाल्याने राजकीय पुढाऱ्यांची आता किती आकडेमोड जुळते यावर गणित अवलंबून आहे. यासह विजयाचे बहुतांश गणित मुस्लीम मतदारांसह अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर फिरत आहेत. कारण जानकरांच्या बाजूने बहुतांश ओबीसी, धनगर-हटकर तर जाधवांच्या पारड्यात मराठा मतदारांसह मुस्लीम आणि दलित मतांचा टक्का पडल्याचे जानकरांचे म्हणणे आहेत.
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारीया लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील २ हजार २९० मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया झाली. यात जिंतूर विधानसभा मतदारसंघात ६२.४३ टक्के, परभणीत ६२.६२, गंगाखेडमध्ये ६३, पाथरीत ६४.२७, परतूर ५९.६० आणि घनसावंगी विधानसभा क्षेत्रात ६०.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे परभणी लोकसभा क्षेत्रात ६२.२६ टक्के मतदान झाले.