परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाजे ५ वर्षांपूर्वी पाण्याने वाहून गेले असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मात्र या बंधाऱ्यातील पाण्यातून पूर्ण क्षमतेने सिंचन होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून मुळी शिवारात गोदावरी नदीवर २०११ मध्ये निम्न पातळी बंधारा उभारण्यात आला होता. यावेळी या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर २० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले होते. या दरवाजे काम व्यवस्थित झाले नसल्याने २०१२ मध्ये ते निखळून पडले. त्यानंतर दरवाज्यांची दुरुस्ती करून ते पुन्हा बसविण्यात आले. सप्टेंबर २०१६ पर्यंत बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले. परंतु, नंतर गोदावरी नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात २० पैकी १६ दरवाजे निखळले. तेव्हापासून अद्यापपर्यंत या दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याचे वीसही दरवाजे बसविल्यानंतर ११.३५ दलघमी पाणीसाठा होऊन गंगाखेड तालुक्यातील ८ व सोनपेठ तालुक्यातील ३ अशा एकूण ११ गाव शिवारातील १ हजार ७०५ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षमता निर्माण झाली असती. परंतु, बंधाऱ्याचे दरवाजे निखळले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. विशेष म्हणजे या बंधाऱ्याच्या कामानंतर शिल्लक असलेला मलबा नदीपात्रातून काढलेला नाही. त्यामुळे हे नदीपात्र उथळ झालेले आहे. परिणामी पाणी थांबण्याची सुतराम शक्यता नाही. बंधाऱ्याच्या परीक्षेत्रात जे काही थोडेफार पाणी थांबले आहे. ते नदीपात्रातील वाळूचा अवैध रित्या उपसा केला गेल्याने मोठ्या प्रमाणात पात्रात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी थांबले आहे. ही सद्य:स्थिती असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बाबीचा विचार न करता केवळ कागदी घोडे नाचवून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ११.३५ दलघमी पाणीसाठा येथे होतो व १७०५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा वार्षिक अहवाल राज्य विधी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला आहे. त्यामुळे महामंडळाचे अधिकारी केवळ कागदावरच सिंचन करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.
मुळी निम्न पातळी बंधाऱ्याचे निकाली झालेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी उभ्या उचल पद्धतीने व्हर्टिकल दरवाजे बसविण्याची मागणी वारंवार केली. मात्र याचा फायदा झाला नाही. नदीपात्राचे खोलीकरणही केले गेले नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना सध्या फारसा फायदा होत नाही.
रमेश पवार, शेतकरी, खळी
जुनाच अहवाल नव्याने सादर
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच पद्धतीचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यावेळीही पूर्ण क्षमतेने सिंचन झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात अशी स्थिती नव्हती. यावर्षी देखील जुन्याच अहवालाची पाने नव्या तारखेत जोडून ती सभागृहाला सादर करण्यात आली आहेत.