केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी कराड यांनी सोमवारी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, रामकृष्ण रौंदळे, मोहन कुलकर्णी, रामदास पवार, शिवाजी मव्हाळे, दिनेश नरवाडकर आदींची उपस्थिती होती. कराड म्हणाले की, पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी इलेक्ट्रीक रेल्वेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तरतूद झाली नसली तरी त्या संदर्भात पाठपुरावा केला असून, पुढील वर्षी या मार्गासाठी तरतूद केली जाईल. मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर सर्व खासदारांना घेऊन रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे. मराठवाडा विभागाचा समावेश मध्य रेल्वेमध्ये करण्याबरोबरच इतर प्रश्नांचाही पाठपुरावा करणार असल्याचे कराड यांनी सांगितले. परभणीत सर्वाधिक पेट्रोलचे दर असून, हे दर कमी करण्याच्या अनुषंगाने मराठवाड्यामध्ये इंडियन ऑईलचा तेल डेपो मंजूर करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी पाहणीही केली असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
केंद्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:19 AM