परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्ल्यू या साथीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
तालुक्यातील मुरुंबा येथे ७ आणि ८ जानेवारी रोजी एकाच पोल्ट्री फॉर्ममधील ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभाग आणि शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी तातडीने मुरुंबा येथे जावून मृत कोंबड्यांची तपासणी केली. या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेनंतर लगेच मुंबई आणि परिसरातील १० कि. मी. अंतरातील गावांत सर्वेक्षण करण्यात आले, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू आजार नेमका काय आहे? या आजारात पक्ष्यांना दिसणारी लक्षणे, त्यावर करावयाचे उपाय याविषयीची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन या काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. तसेच पुन्हा एकदा प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे, डॉ. श्रीनिवास कारले यांनी हे प्रशिक्षण दिले.
पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीस प्रतिबंध
तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या गावशिवारापासून ५ कि.मी. परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वातहूक, बाजार, जत्रा आणि प्रदर्शन भरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
आरआरटी पथकांची स्थापना
या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन केली आहे. हे पथक जिल्ह्यातील प्रत्येक गावास भेट देऊन कुक्कुट पक्ष्यांची माहिती घेणार आहे. त्याचप्रमाणे बर्ड फ्ल्यूसंदर्भात माहिती आढळल्यास तातडीने कारवाई करणार आहे. या पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेच्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यात बर्ड फ्ल्यू या साथीचा प्रसार होत असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, दररोज जिल्ह्यात मृतक पक्ष्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे.
डॉ.प्रकाश सवणे, पशुधन विकास अधिकारी