परभणी : राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठांना २०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली असून, कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे बळकटीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिली.
वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात राज्यातील कृषीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि साधन सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्रती वर्षी २०० कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची प्रतिक्रिया घेतली. ते म्हणाले, कृषी विद्यापीठांतील साधन सुविधा बळकटीकरणासाठी आम्ही सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होतो. शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या अनुषंगाने दीडशे कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मागील सरकारने या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यामुळे शासनाचे अभिनंदन. कृषी क्षेत्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. विशेषत: डिजिटलायझेशन होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. काळानुरूप कृषी क्षेत्रातही मोठे बदल करणे आवश्यक असल्याने आम्ही पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार २०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाली आहे. त्यातून नवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित करणे, सिंचनाच्या सुविधांमध्ये भर घालणे, प्रक्षेत्रांची वाढ करून त्याचा विकास करणे, विद्यापीठातील प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटलायझेशन करणे या बाबींवर भर देत एकूणच शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील साधन सामग्रीच्या अद्ययावतीकरणासाठी हा निधी वापरला जाईल. तरतूद झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे कुलगुरू डॉ. ढवण यांनी सांगितले.