परभणी : राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठांना २०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली असून, कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे बळकटीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदीसंदर्भात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांची प्रतिक्रिया घेतली. ते म्हणाले, शिक्षण, संशोधन आणि विस्तारकार्याच्या अनुषंगाने दीडशे कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. मागील सरकारने या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यातून नवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित करणे, सिंचनाच्या सुविधांमध्ये भर घालणे, प्रक्षेत्रांची वाढ करून त्याचा विकास करणे, विद्यापीठातील प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटलायझेशन करणे या बाबींवर भर देणार असल्याचे ढवण यांनी सांगितले.