परभणी : सेंद्रिय शेतमालास बाजारात मोठी मागणी आहे. सेंद्रीय शेती संशोधनाबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आवश्यक सेंद्रीय निविष्ठा शेतावरच तयार करणे, विविध तंत्रज्ञान पद्धतीचा शेतकऱ्यांच्या शेतावर वापर करणे, सेंद्रीय प्रक्रिया उद्योग या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २१ मार्च या काळात सातदिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. ढवण बोलत होते.
अध्यक्षस्थानी गाझियाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, जबलपूर येथील डॉ. ए. एस. राजपूत, गंगटोक येथील डॉ. रविकांत अवस्थी, पुणे येथील उपसंचालक अशोक बाणखेले, आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. रामानजानेयलू, डॉ. रणजित चव्हाण आदींची उपस्थिती होती. डॉ. ढवण म्हणाले, देशात विविध भागात सेंद्रीय शेती पद्धतीत मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. सेंद्रीय शेती संशोधनाच्या दृष्टीने आंतरशाखीय दृष्टिकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी समन्वय महत्त्वाचा आहे. सेंद्रीय शेतीबाबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ व शेतकरी यांचे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले.
डॉ. ए. एस. राजपूत, डॉ. आर. के. अवस्थी, अशोक बाणखेले यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. वाचस्पती पांडे यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी ‘सेंद्रीय शेतीमध्ये पीक व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजित कदम, डॉ. सुनील जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी प्रयत्न केले.