शहराचा विस्तार वाढत आहे. मुख्य शहरापासून दूर अंतरावर वसाहती निर्माण होत आहेत ; परंतु मूळ गावात सध्या रिकाम्या प्लॉटची संख्या कमी झाली आहे. काही जणांनी गुंतवणुकीच्या निमित्ताने हे प्लॉट घेऊन ठेवले आहेत ; परंतु मोकळ्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे प्रकार या काळात घडले आहेत. मागील काही वर्षांपासून असे प्रकार वाढत आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो ; परंतु पुढील कारवाई मात्र धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे मूळ मालकाला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष झगडावे लागते. त्यामुळे मोकळे प्लॉट सांभाळायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. काही मूळ मालकांनी मोकळ्या प्लॉटला तारेचे कुंपण करून त्याठिकाणी स्वतःच्या नावाचा फलक लावला आहे. तर काही जणांनी मूळ रजिस्ट्री असतानाही मोकळ्या प्लॉटवर मालकी हक्काचा फलक लावला आहे. परस्पर प्लॉटची रजिस्ट्री करून देण्याचे प्रकार होत असल्याने प्लॉट मालकांनी मात्र आता काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
मोकळ्या प्लॉटवर अनेकांचा डोळा
प्लॉट खरेदी करून त्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण मागील काही दिवसापासून वाढले आहे. एकदा प्लॉट खरेदी केल्यानंतर काही महिन्यातच प्लॉटची किंमत वाढते. त्यातून दुप्पट पैसा प्राप्त होतो. त्यामुळे प्लॉटमध्ये गुंतवणूक केली जात आहे ; परंतु शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अशा प्लॉटवर काही जणांनी डोळा ठेवत हे प्लॉट स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून प्लॉट मालकाला तो प्लॉट विक्री करण्यासाठी बाध्य करणे, त्याला वारंवार त्रास देणे असे प्रकारही शहरात घडले आहेत. त्यामुळे मोकळ्या जागा सांभाळताना प्लॉट मालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाण्यांमध्ये एकत्रित नोंदीचा अभाव
मोकळ्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे किंवा एकाच प्लॉटच्या तीन-तीन रजिस्ट्री झाल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल होतात ; परंतु या तक्रारींची एकत्रित नोंद मात्र पोलीस प्रशासनाकडे नसल्याने प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक झाल्याच्या किती तक्रारी दाखल झाल्या याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही तक्रारी
मूळ मालकाला बाजूला ठेवून एखाद्या प्लॉटची परस्पर विक्री झाल्याची प्रकरणे यापूर्वी घडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये मूळ मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दिले आहेत ; परंतु ही प्रकरणे देखील वर्षानुवर्षे प्रलंबित राहत आहेत.