बसस्थानकात खाजगी वाहनांचा गराडा
परभणी : येथील बसस्थानक परिसरास खाजगी वाहनांचा गराडा पडला असून, या वाहनांच्या विळख्यातून स्थानकाबाहेर बस काढताना चालकाला कसरत करावी लागत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे बसस्थानक कार्यरत केले आहे. याठिकाणी वाहनतळाची जागा नसल्याने मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
जिल्ह्यात वाढली दारूची अवैध विक्री
परभणी : जिल्ह्यात दारूची अवैध विक्री वाढली आहे. गावागावात रात्रीच्या वेळी अवैध मार्गाने दारु पोहोचती केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या दारूविक्री विरुद्ध कारवाई केली असली तरी प्रत्यक्षात अवैध विक्रीला आळा बसलेला नाही.
मुख्य रस्त्यावरील डीपी धोकादायक
परभणी : येथील नारायण चाळ रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर बसविलेली डीपी धोकादायक बनली आहे. या डीपीचे दरवाजे सताड असून वाहनधारकांना विजेचा धक्का लागून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन डीपीला दरवाजे व कुलूप बसवावेत, अशी मागणी होत आहे.
वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानकावरील मोकळ्या जागेत कुठेही वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, स्थानकातून प्रवांशांना मार्ग काढतांना कसरत करावी लागत आहे. सध्या बसस्थानक भागात नवीन बसपोर्टच्या इमारत उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी जुनी इमारत पाडल्याने समस्या वाढली आहे.
वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा
परभणी : शहरात जागोजागी वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा उडविला जात आहे. सर्रास नियम मोडत वाहने चालविली जात असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. विरुद्ध मार्गाने वाहने चालविणे, नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणे, त्याचप्रमाणे टिबल सीट वाहन चालविले जात आहेत. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.