परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तंत्रनिकेतन प्रवेशासाठी आतापर्यंत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५० टक्केच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षीच्या अर्जांची संख्या पाहता, विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, अशी आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.
जिल्ह्यात एक शासकीय आणि दोन खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १८० जागा आहेत. तर तीनही तंत्रनिकेतनमध्ये मिळून ६०० जागा आहेत. मात्र प्रवेश क्षमतेच्या तुलनेत मागील वर्षी सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्यामुळे यंदा किती विद्यार्थी तंत्रनिकेतनसाठी प्रवेश घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत दहावी परीक्षेचा निकाल लागला नसल्याने प्रवेश नोंदणीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र निकाल लागल्यानंतर हळूहळू तंत्रनिकेतनसाठी नोंदणी होऊ लागली आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २३ जुलै ही प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून, नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल. त्यामुळे नोंदणीची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
दहावीच्या निकालानंतर वाढली गती
तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दहावीच्या निकालाची अडचण होती. आता दहावी परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.
हा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत.
सध्या तरी केवळ राखीव विद्यार्थ्यांचीच अडचण आहे.
राखीव जागेसाठी अडचण
तंत्रनिकेतनच्या प्रवेश नोंदणीसाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. राखीव जागांवरुन प्रवेश घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर आणि कास्ट सर्टीफिकेट हे दोन प्रमाणपत्र लागतात.
दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
नॉन क्रिमीलेअर आणि कास्ट सर्टीफिकेट विद्यार्थ्यांना वेळेत द्यावेत, यासाठी तंत्रनिकेतनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे प्रक्रियेला गती मिळेल.
तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, यासाठी मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
व्हॉटस्ॲप आणि इतर माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पॉलेटेक्नीक असलेले विविध कोर्सेस, त्याचा होणारा फायदा याविषयी माहिती दिली आहे.
प्रवेशासाठी आणखी दोन दिवसच शिल्लक असले तरी आगामी काळात नोंदणीची मुदत वाढेल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची संधी मिळेल व गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश वाढतील, अशी आशा तज्ज्ञांना आहे.
५० टक्के जागा होत्या रिक्त
जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १८० प्रवेश क्षमता आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १०६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले होते. ४३ टक्के जागा रिक्त होत्या. तर परभणी आणि सेलू येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातही ५० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
मागील काही वर्षांपासून तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी रायझिंग ट्रेंड आहे. साधारणत: दरवर्षी १५ टक्के प्रवेश वाढत आहेत. त्यामुळे यावर्षी देखील विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढतील. एन.सी.एल. आणि कास्ट सर्टीफिकेटची अडचण दूर झाल्यानंतर नोंदणीला गती मिळेल. दहावीचे गुणपत्रक, टीसीची अडचण नाही.
- डॉ.किरण लाडाणे, प्राचार्य