परभणी : स्वस्त धान्य वितरण प्रणाली अंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक मशीनमध्ये नोंद करून घ्यावा, अशा अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी रेशन दुकानदारांना दिल्या आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात २१ जानेवारीला जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी दुकानदारांना मार्गदर्शन केले. प्रत्येक रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक इ-पॉस मशीनमध्ये नोंद करणे बंधनकारक आहे. सर्व दुकानदारांनी त्यांना उपलब्ध झालेले धान्य वेळेत उचलून ते लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचनाही मुथा यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे, लाभार्थ्यांनीही आपली जबाबदारी समजून मशीनमध्ये ज्या व्यक्तींचे नाव आहे, परंतु आधार क्रमांक नाही, अशा लाभार्थ्यांचे आधार क्रमांक रेशन दुकानदारांकडे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी रेशन दुकानदारांना बारकोड स्कॅनर मशीन वाटप करण्यात आल्या. बैठकीस नायब तहसीलदार कैलास वाघमारे, बी.पी. दळवे, शेख खाजा अ.रशीद, लक्ष्मण राऊत आदींची उपस्थिती होती.