लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापसाने भरलेला ट्रॅक्टर उभ्या आॅटोवर उलटल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन समोर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.टाकळी बोबडे येथील एम.एम.२२ एक्स-१४४२ क्रमाकांचा ट्रॅक्टर ३५ क्विंटल कापूस भरुन वसमतरोडहून गंगाखेड रस्त्याकडे जात होता. हा ट्रॅक्टर रेल्वे स्थानकासमोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यात हा ट्रॅक्टर बाजुला उभ्या असलेल्या एम.एच.२२-एपी ३३२ व एम.एच.३८-४७९६ या दोन अॅटोवर उलटला. एका आॅटोमध्ये कोणीही नव्हते. तर दुसऱ्या आॅटोचे चालक रामेश्वर मुंडे हे वाहनामध्येच होते. घटना घडल्यानंतर बाजुच्या नागरिकांनी त्यांना तात्काळ आॅटोतून बाहेर काढले. त्यांना या घटनेत कोणतीही इजा झाली नाही; परंतु, त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व इतर वाहने रस्त्याच्या बाजुला केले. त्यानंतर या रस्त्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.
परभणी शहरातील घटना; कापसाचा ट्रॅक्टर आॅटोवर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:46 PM