कुपटा पाटी ते कुपटा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील गुळखंडकडून वाहणारा ओढ्यावर कमी उंचीचा २५ वर्षे जुना पूल आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी हा पूल खचला असून, निम्मा भाग वाहून गेलेला आहे. पावसाळ्यात पुरामुळे अनेकदा गावांचा संपर्क तुटतो, तसेच वाहतूक ठप्प होते. शाळेत विद्यार्थांना पावसाळ्यात ये-जा करता येत नाही, तसेच गावातील शेतमाल बाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करताना कसरत करावी लागते. पूर आल्यानंतर रुग्णाना दवाखान्यात दाखल करणे अवघड होत असे. केवळ मुरमाचा भराव टाकून दरवर्षी वाहतूक सुरू केली जाते. २००५ साली पुराच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे, तसेच पुरामुळे वेळीच रुग्णाला दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झालाचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या पुलाचे काम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते. या पुलाच्या कामासाठी नाबार्ड २५ मधून जुलै, २०१९ मध्ये प्रारूप मंजुरी मिळाली होती. त्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तांत्रिक मान्यता पूर्ण झाली असून, कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे, तसेच पुलाचे काम दर्जेदार करणे आवश्यक आहे. निधी मंजूर झाल्याने अनेक वर्षांपासूनचा पुलाचा प्रश्न मार्गी आहे.
कुपटा येथील पुलाच्या कामासाठी नाबार्डमधून निधी मंजूर झाला आहे. पुलाची उंची १८ फूट तर रुंदी २५ फूट असणार आहे. ९०० फूट लांबी आहे. फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. मेअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- पी एन कोरो, उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग सेलू