महिला पोलीस यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर वाहतूक शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत राहून सेवा बजावावी लागते. यामध्ये कामाच्या वेळा निश्चित नसतात. त्यात किमान १० ते १२ तास घरापासून दूर रहावे लागते. अशा वेळी घरातील लहान मुलांना त्यांच्या आईसोबत वेळ घालवता येत नाही तसेच आईची आठवण येत असतानाही घरात मन रमवावे लागते. यावर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक लहान मुलांना त्यांच्या आईसोबत गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे व फिरायला जाणे यासह अन्य गंमती जमती करण्याला वेळ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी याची प्रतीक्षा महिला पोलिसांच्या पाल्यांना व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना लागली आहे.
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे १९
एकूण पोलीस १८९२
महिला पोलीस २००
आता आईसोबत रोज खेळता येणार
आईची दररोज काही वेळासाठी भेट होते. दररोज दिवसभर आई घरी नसते. त्यामुळे कंटाळवाणे होते. बाबा किंवा आजूबाजूच्या मुलांसोबत खेळून मन रमवतो. आता आई लवकर घरी येऊ शकणार हे चांगले आहे. - विरेन व्यंकटेश मुरकुटे.
माझी आई पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. ती १० ते १२ तास घरी येत नाही. मी आणि माझी बहीण एकमेकांची काळजी घेऊन घरामध्ये वेळ घालवतो. आता आईचे कामाचे तास कमी झाल्याचा आनंद आहे. - आराध्या भुसारे.
घरामध्ये खेळ खेळून, मोबाईल पाहून कंटाळा येतो. दररोज आई लवकर घरी यावी असे वाटते. आता ते शक्य होणार आहे. यामुळे आईसोबत गप्पा मारणे, अभ्यास करणे आणि फिरायला जाणे यासाठी वेळ घालता येणार आहे. - आदर्श गंगाधर ठेंगे.