परभणी :शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या रिंधा टोळीकडून त्यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती पुढे आली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे.
खासदार संजय जाधव यांना गेल्या काही वर्षांपासून अशा धमक्यांचे फोन व जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. सध्या त्यांना परभणीतून कुणीतरी रिंधा टोळीच्या माध्यमातून जीवे मारण्याची सुपारी दिल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली. गेल्या ३० वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे. प्रत्येकी दोनदा आमदार व खासदार म्हणून माझी जिल्ह्यात लोकप्रियता आहे. शिवसेना ठाकरे कुटुंबीयांशी मी एकनिष्ठ असून या बदलत्या परिस्थिती सुद्धा त्यांच्यासोबत उभा आहे. जाधव यांना जीवे मारण्यासाठी तीन कोटीची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून समोर आली आहे. माझ्या जिवाला धोका असून मला सुरक्षारक्षक पुरवावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
परभणीतूनच सुपारी दिल्याची माहितीमाझे कुणाशीही राजकीय हाडवैर नाही, मी एक सच्चा शिवसैनिक असून जनतेच्या सेवेसाठी गेल्या ३० वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. मला जीवे मारण्यासंदर्भात परभणीतूनच कोणीतरी नांदेडच्या रिंधा टोळीला सुपारी दिल्याची माहिती असून याचा पोलीस प्रशासनासह राज्याच्या गृह विभागाने उलगडा करावा. - संजय जाधव, खासदार
सुरक्षा दिली आहे खासदार संजय जाधव यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना सुरक्षारक्षक पुरवली आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात कोणीतरी सुपारी दिल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्याला आवश्यक तो सुरक्षारक्षक दिला आहे.- रागसुद्धा. आर, जिल्हा पोलीस अधीक्षक