पाथरी : तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीपात्रातील बोटीद्वारे ५०० फूट अंतरावरून हजारो ब्रास वाळूचा उपसा करणाऱ्या दोन बोटी महसूलच्या पथकाने १६ मार्च रोजी जप्त केल्या. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पाथरी तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीचे पात्र तारुगव्हाण बंधाऱ्याच्या बॅक वॉटरने तुडुंब भरले आहे. या नदीपात्राच्या पलीकडे परळी तालुक्यातील डिग्रस गावचा शिवार लागतो. येथून मागील दीन महिन्यांपासून डिग्रस भागातील काही वाळू तस्कर गोदावरी नदीच्या पात्रात बोटी सोडून त्या बोटीला ५०० फूट मोठा पाईप बसवून त्या पाईपच्या साहाय्याने पाथरी तालुक्यातील उमरा हद्दीतून बेसुमार अवैध वाळूचा उपसा सुरू केला आहे. हा प्रकार उमरा ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना भ्रमणध्वनीद्वारे अवैध वाळू उपशाबद्दल माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार यांना या प्रकरणाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ मार्च रोजी नायब तहसीलदार एस. बी. कट्टे, मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे, गुंज सज्जाचे तलाठी निरडे यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास उमरा भागातील गोदावरी नदीच्या पात्राला भेट दिली. तेव्हा गोदावरी नदीपात्रात असलेल्या दोन बोटी व वाळू उपसा करण्यासाठी असलेला ५०० फूट पाईप या पथकाने जप्त केला. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
हद्दीचा घेतला फायदा
बीड जिल्ह्यातील डिग्रस येथील गोदावरी नदीपात्रात त्या भागातील वाळू माफिया दीड महिन्यापासून पाथरी तालुक्यातील उमरा गावच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत होते. या प्रकरणी ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. परिणामी हा वाळू उपसा रात्री-अपरात्री बोटीच्या साहाय्याने दीड महिन्यापासून सुरूच होता. या दीड महिन्यात हजारो ब्रास वाळू चोरी करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी महसूल पथकाने जप्त केलेल्या दोन बोटीच्या अनुषंगाने वाळू चोरांवर काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.