मातोश्रीनगर परिसरात रस्ता आणि नालीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे; मात्र डीपी प्लॅनमध्ये हा भाग मोकळी जागा म्हणून दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या भागात रस्ते, नालीच्या सुविधा अद्याप करण्यात आल्या नाहीत. परिणामी, रहदारीसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संत तुकाराम महाविद्यालयापासून वसाहतीत जाण्यासाठी रस्ता आहे; परंतु सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. तेव्हा या भागात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा १७ मार्च रोजी धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा गंगाधर धस, रोहिदास मोगल, विष्णू अंभोरे, डिगांबर अंभोरे, शिवाजी काळंखे, पांडुरंग सुनले, माणिक शेळके, सुरेश काचेकर, इंद्रजीत पांचाळ, अशोक एंगडे आदींनी दिला आहे.
कर भरुनही मिळेनात सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:18 AM