देवगांवफाटा - सेलू हा रस्ता राष्ट्रीय मार्गरस्ता म्हणून सामावेश झाला असून हा १५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण,साईडपट्ट्या भरण्याचे काम करण्यासाठी राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग जालना यांचेकडून दत्तराज कन्स्ट्रक्शनला ६ कोटी रुपयांचा कार्यारंभ आदेश मार्च २०२० मध्ये दिला होता. मात्र, कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरही हे काम सुरू होत नव्हते. याबाबत लोकमतने ३ जुलै २०२०,१४ जुलै २०२० व ९ सप्टेंबर २०२० च्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम उपविभाग जालना यांनी दखल घेऊन संबधित गुत्तेदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अखेर ९ महिन्यांनंतर दत्तराज कन्स्ट्रक्शनकडून या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम काम सुरू झाले होते. हे डांबरीकरणाचे काम ८ डिसेंबर रोजी २०२० रोजी पूर्ण झाल्यानंतर या भागातील महत्त्वाचा रस्ता असलेला देवगांवफाटा - सेलू या रस्त्यावर वाहतुकीसाठी वाहनचालकांना ते सोईचे झाले आहे. मात्र, या १५ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणालगत दोन्ही बाजूने साईडपट्ट्या भरणे अंदाजपत्रकानुसार अनिवार्य आहे. डांबरीकरणाच्या कामानंतर ३ महिने उलटले तरी संबंधित गुत्तेदाराने साईडपट्ट्या भरल्या नाहीत. त्यामुळे डांबरीकरणाच्या बाजूचा भाग जवळपास ६ इंच कमी असल्याने वाहनास बाजू देतांना किंवा ओव्हरटेक करतांना वाहने रस्त्याच्या खाली जाऊन अपघात होत आहे. असाच प्रकार १० मार्च रोजी एक जीप, दुचाकीला बाजू देतांना रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने गती कमी आसल्याने कोणताही धोका झाला नाही.
साईडपट्ट्या न भरल्याने वाढला अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM