मराठी भाषा फाऊंडेशन योजनेंतर्गत जिल्ह्यात मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या शैक्षणक वर्षात ही नियुक्ती झालेली नाही. त्याचप्रमाणे २०१९-२० या वर्षातील तीन महिन्यांचे मानधनही शिक्षकांना अदा केले नाही. त्यामुळे शिक्षक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. डिसेंबर महिन्यापासून नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तेव्हा या वर्गांसाठी ५ महिन्यांसाठी मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करावी, त्यांचे मानधन वाढवावे, २०२१-२२ या वर्षात मानसेवी शिक्षकांना कायम करावे, या शिक्षकांचे जानेवारी ते मार्च २०२० या काळातील थकीत असलेले तीन महिन्यांचे मानधन त्वरित खात्यावर जमा करावे आदी मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
परभणी तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मनहाजी कादरी, शेख मतीन, मो. मोईन अन्सारी, डॉ. फारुख इस्माईल, शेख तब्बूल पटेल, अब्दुल रशीद मामू, अब्दुल रशिद अब्दुल सत्तार, शेख मुक्तार शेख उस्मान आदींनी हा प्रश्न उचलून धरला आहे.