- चंद्रकांत देवणे
वसमत (जि. हिंगोली) : वसमतमधील पॉवरलूम उद्योग तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय ही इंडस्ट्री चालू असून, तब्बल ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालू आहे. पण, कधी काळी प्रसिद्ध असलेला पॉवरलूम उद्योग आता दस्तीपुरता शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत त्याला गरज आहे ती राजाश्रय मिळण्याची!
हातमागासाठी प्रसिद्ध असलेल्या वसमतमध्ये विणकर समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे घरोघरी हा व्यवसाय चालायचा. त्यावरच कुटुंब चरितार्थ चालायचा. हातमागाचे ‘वसमत टेरिकॉट’ कापड प्रसिद्ध होते. ते दूरदूरपर्यंत जायचे. यांत्रिकीकरणाने हातमाग कालबाह्य झाले. त्याची जागा यंत्रमागाने घेतली. वसमत येथे टेक्सकॉमचा यंत्रमाग प्रकल्प कार्यरत झाला. विणकरांना सभासद करून मजुरीवर कपडा उत्पादन केले जायचे. त्याकाळी हाच वसमतच्या विणकरांच्या रोजीरोटीचे साधन होते. शेकडो मजूर येथे काम करायचे. नांदेडच्या टेक्सकॉमवरून कच्चा माल यायचा. त्यातून कापड तयार होऊन परत टेक्सकॉमला जायचे. मीटरप्रमाणे मजुरी मिळायची. वसमतच्या विणकरांसाठी यंत्रमाग प्रकल्प मोठा आधार होता. मात्र, काळाच्या ओघात हा प्रकल्प बंद झाला. तेथील सभासदांना मालकी मिळाली. तेथील यंत्रमागावर विणकर स्वत:चे भांडवल लावून कापड उत्पादन करत आहेत.
आजघडीला शहरात हजारांवर खाजगी यंत्रमाग चालतात. काही ठराविक मालकांकडे यंत्रमाग आहेत ते स्वत: भांडवल लावून उत्पादन करतात. तर उर्वरित दुसऱ्यांकडून कच्चा माल घेऊन मजुरीवर कापड उत्पादन करून देतात. यावर यंत्रमाग चालवणारे मजूर, भीम भरणारे, कांडी भरणारे, जॉबर (मेकानिक), तयार कापड धुलाई करणारे, इस्त्री करणारे, दस्तीला गाठी मारणारे, कापड विक्री करणारे सेल्समन आदी हजारो हातांना काम मिळते. शासनाची कोणतीही मदत व सवलत नाही. बँका कर्ज देण्यास तयार नसतात, अशा अवस्थेत वसमतमध्ये हा व्यवसाय सुरू आहे. ५ हजारांवर कुटुंबाच्या चुली चालतात. असा व व्यवसाय दुर्लक्ष्ति आहे. आता हळूहळू अडचणीत आला आहे. बंद पडण्याचीही भीती आहे.
धोतीवरून दस्तीवरवसमतमध्ये कधीकाळी वसमत टेरिकॉट उत्पादन व्हायचे. कापडाच्या स्पर्धेत टेरिकॉट वापरणारे संपले आणि वसमत टेरीकॉट इतिहास जमा झाले. पावरलूमवर धोती उत्पादन सुरू झाले. वसमतची धोती ही राज्यभरात प्रसिद्ध झाली होती. आता धोती वापरणारे घटले आणि धोती उत्पादनही बंद झाले. आता वसमतमध्ये दस्तीचे उत्पादन प्रसिद्ध झाले आहे. त्याला विदर्भात मागणी आहे. दस्तीसाठी लागणारा कच्चा माल मुंबई, इचलकरंजी, भिवंडीहून येतो. वसमत येथील रोकडेश्वर सूतगिरणीवर उत्पादित होणारे सूत वापरले जायचे. त्यामुळे कापड उत्पादकांना वाहतुकीचा खर्च वाढला आहे. व्यवसाय अडचणीत आहे. उत्पादन कमी होत आहे. नफा कमी झाला आहे.
नव्या पिढीची पाठ : व्यवसायात काम करणारे मजूर अशिक्षित व अल्पशिक्षित आहेत. परंपरेने व अनुभवाने ते हे काम शिकतात. कुशल मजूर तयार करण्यासाठी प्रशिक्षणही नाही. परिणामी, या कामात नवी पिढीचे तरूण येत नाही. एकीकडे बेरोजगारांच्या फौजा असताना दुसरीकडे मजूर नाहीत म्हणून पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे.
मदतीचे मार्ग बंदशासनाची मदत नाही. बँका कर्ज देत नसल्याने स्वत:च्या मालकीचे यंत्रमाग असून भांडवल नाही. त्यामुळे मजुरीवर व्यवसाय करावा लागत आहे. या व्यवसायातील अडचणींकउे लक्ष देण्याची गरज आहे. -गोपाल महाजन, विणकर सोसायटी सचिव
अडचणी वाढत चालल्यापॉवरलूम व्यवसायात मजूर मिळत नाही. मजुरी वाढवली, तर तोटा होतो. कमी केली, तर मजूर काम सोडून जातात. नव्या पिढीचे तरूण हे काम करण्यास तयार नाहीत. इतरही अनेक अडचणी आहेत. यात कोणी मदत करीत नाही. कच्चा मालही मिळणे अवघड झाले. - नारायण गठडी, व्यावसायिक