परभणी : प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत मिरवणुका, ढोल-ताशांना फाटा देत, जिल्ह्यात लाडक्या गणरायाला निरोप देत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची साद घालण्यात आली. परभणी महापालिकेने घरोघर जाऊन संकलित केलेल्या ३७ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी या वर्षीही सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे जिल्हाभरात घरोघरी शांततेत हा उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी गणेशोत्सवाची सांगता झाली. गणरायाला निरोप देतानाही मिरवणुका काढल्या नाहीत. त्यामुळे शांततेत व उत्साहात बाप्पांना निरोप देण्यात आला.
महानगरपालिकेने गणेशमूर्ती संकलित करण्यासाठी ३५ वाहने सज्ज ठेवली होती. सजविलेल्या या वाहनांतून गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या.
वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात १८ फूट खोलीचा विसर्जन हौद तयार केला होता. या भागात विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले होते. १९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यानंतर, रात्री १२ वाजेपर्यंत मनपा कर्मचाऱ्यांनी श्रींचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त देविदास जाधव, तहसीलदार संजय बिराजदार, तलाठी शेख, पाणीपुरवठा विभागाचे शेख इस्माईल, दिलीप अय्या, भगवान काळे, राजकुमार जाधव, सुधाकर किंगरे, लक्ष्मण जोगदंड आदी अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत विसर्जनस्थळी उपस्थित होते. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासूनच शहरात प्रत्येक चौकात बंदोबस्त लावला होता.
१५६ मोठ्या गणेशमूर्ती व ३६,६४१ छोट्या गणेशमूर्तींचे मनपाने केले विसर्जन.