परभणी : शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली.
माणिक पांडुरंग इखे असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. माणिक यांच्या नावे कौसडी शिवारामध्ये दीड एकर शेती होती. यासोबतच त्यांच्यावर बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ४० हजार रूपये कर्ज होते. माणिक यांना शेतात सततची नापिकी असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची कायम चिंता होती. यातूनच त्यांनी गुरुवारी (दि.१ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतामध्ये किटकनाशक प्राशन केले.
ही बाब त्यांच्या नातेवाईकांना लक्षात येताच त्यांनी माणिक यांना तत्काळ बोरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान २ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. के. पवार यांनी सांगितले. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. माणिक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.