पाथरी (परभणी ) : मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. कृष्णा कोल्हे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालूक्यातील उमरा येथील शेतकरी कृष्णा शेषराव कोल्हे यांची उमरा शिवारात शेती असून त्यांनी शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. यातच मागील काही वर्षांपासून शेतात काहीच पिकत नाही. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडणार कुंटुबाचा उदनिर्वाह कसा चालवणार याच विवंचनेत ते कायम असायचे. दरम्यान गुरुवारी सकाळी कामानिमित्त म्हणून ते पाथरी येथे आले. येथे त्यांनी विषारी द्रव्याची बाटली विकत घेतली व सायंकाळी परत घरी परत आले. यानंतर रात्री त्यांनी सोबतचे विषारी द्रव्य प्राशन केले. यासोबतच त्यांनी कुटुंबियांना व जवळच्या नातलगांना फोनकरून याची कल्पना दिली. याबाबत ग्रामस्थानां माहिती मिळताच त्यांनी कोळे यांना रात्रीतून पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे. याप्रकरणी कोल्हे यांचे चुलत भाऊ विकास कोल्हे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.