४६ हजार तक्रारींना केराची टोपली
परभणी : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी आणि पीक काढणीनंतर ७ हजार अशा एकूण ४६ हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
हरभऱ्याची नोंदणी करण्याची मागणी
ताडकळस : पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने पूर्णा शहरात हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी या केंद्राकडे परिपूर्ण कागदपत्रासह नोंदणी करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रल्हादराव होनमने यांनी केले आहे.
‘ग्रामसडक योजनेची चौकशी करा’
परभणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश ठिकाणी कामात अनियमितता आढळून येत आहे. त्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी भांबरवाडी, मुळीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
काम पूर्ण होण्याआधीच उखडला रस्ता
गंगाखेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम पूर्ण होण्याआधीच डांबरीकरण झालेला रस्ता उखडला आहे. त्यामुळे नागठाणा पाटी ते सुनेगाव या रस्त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम पुन्हा करून घ्यावे, अशी मागणी नागठाणा ग्रामस्थांनी केली आहे.
गंगाखेड शहरावर पाणीटंचाईचे सावट
गंगाखेड : शहराजवळ धारखेड परिसरात गोदावरी नदीपात्रात साठलेले पाणी १६ फेब्रुवारी रोजी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आगामी उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी
गंगाखेड : शहरातील रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध नगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे. नागरिक बाजारपेठ व शहरात फिरताना साेशल डिस्टन्सलाही फाटा देत असल्याचे बुधवारी दिसून आले.
इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त
गंगाखेड : पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख बुधवारीही कायम राहिल्याने इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. साध्या पेट्रोलने शंभरी पार केल्याने वाहनधारकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होताना दिसून येत आहे.