गंगाखेड: सोयाबीन पिकाचा पिकविमा तात्काळ द्यावा या मागणीसाठी डोंगरी विकास जन आंदोलनाच्यावतीने शेतकरी बांधवांनी सोमवारी तहसिल कार्यालयासमोर भजन धरणे आंदोलन केले. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या माखणी, पिंपळदरी महसूल मंडळातील सोयाबीन पिक हातून गेल्यानंतर ही या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिकविमा मिळाला नाही. रखडलेला पिकविमा तात्काळ देण्यात यावा व फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी डोंगरी विकास जन आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजेदरम्यान ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी भजन सादर करत न्याय मागितला. 'पिकविमा भरून झालो आम्ही कंगाल, विमा कंपनी झाली की मालामाल', 'पिकविमा भरून भरून शेतकरी बर्बाद झाला हो' आदी भजनाच्या माध्यमातून व्यस्थ मांडल्या. यानंतर आंदोलकांनी तहसिल कार्यालयामार्फत प्रशासनाला निवेदन सादर केले.
या निवेदनावर डोंगरी विकास जन आंदोलनचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे, जगन्नाथ मुंडे, आश्रोबा सोडगीर, सिताराम देवकते, पंडितराव सोडगीर, योगेश फड, रामराव मुंडे, भास्कर सांगळे, बाबुराव नागरगोजे, विजयकुमार गरड, केशवराव भेंडेकर, अशोकराव मुंडे, नागनाथ गरड, धनराज मुंडे, लक्ष्मण भालेराव, दत्तराव आयनिले, महादेव सोन्नर, गणेश घरजाळे, मारोती मरगीळ, भगवान सांगळे, महादेव मुंडे, बालासाहेब सोडगीर, नाथराव सांगळे, अनंता दहिफळे, संभाजी गरड, अशोक फड, बालासाहेब तिडके, रामराव मुंडे, महारुद्र मुरकुटे, शंकर रूपनर, राम खांडेकर आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.