परभणी: पिकविमा योजनेतील तरतुदीनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होत असलेल्या पीक नुकसानीच्या पोटी तत्काळ पिक विमा भरपाई देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी परभणी- गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
परभणी जिल्ह्याची नजर आनेवारी व पर्जन्यमान आकडेवारीच्या आधारे जिल्हा दुष्काळ घोषित करून तत्काळ उपायोजना सुरू कराव्यात, पीक कर्जाचे तत्काळ पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यात यावेत, बचत खात्यावरील लावलेले निर्बंध तत्काळ उठवावेत, २०२१ मधील खरीप हंगामाच्या पिकांच्या नुकसानी पोटी विमा कंपनीकडे थकीत ४७६ कोटी रुपये तत्काळ देण्यात यावेत, कांदा अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्यावा, महानगरपालिकेने होऊ घातलेल्या कचरा डेपो तत्काळ रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता परभणी- गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, कॉम्रेड राजन क्षीरसागर, बाळासाहेब रेंगे, रावसाहेब रेंगे, सोनाली देशमुख, अजय चव्हाण, प्रदीप सोनटक्के, अमोल जाधव, प्रसाद गोरे, शिवाजी कदम, उमेश मिरखेलकर, कैलास टेकाळे, परमेश्वर यादव, रामदास दळवे, जनार्दन सोनवणे, नरहरी ढगे यासह यांच्यासह शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.
सभापतीं, उपसभापतीनीही रस्त्यावर मांडले ठाणकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण यांनीही शेतकऱ्यांना तत्काळ अग्रीम रक्कम लागू करावा, यासह विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत. परभणी- गंगाखेड या महामार्गावर ठाण मांडले.