परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली १६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिंतूर रोड आणि वसमत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
परभणी शहरालगत असलेल्या जिंतूर रोडवरील जलालपूर पाटी येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. साधारणतः अर्ध्या तासाच्या या आंदोलनामुळे परभणी- जिंतूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
केशव आरमळ, भगवान सामाले रावसाहेब पुंजारे,पंडित कोके, उमराव चव्हाण, केशव थोरात, श्रीराम बुधवर, मारोती कोके, रामभाऊ देशमुख आदींसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
वसमत रस्त्यावरही याच मागणीसाठी त्रिधारापाटी येथे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, मागील वर्षीच्या केळी पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.