परभणी : जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे म्हटले जाते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून परभणीच्या एका शेतकऱ्याने चक्क हेलिकॉप्टर खरेदीसाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. शेती व्यवसायात अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा संबंधित शेतकऱ्याचा विचार असल्याचे त्याने बँकेकडे मागणी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शेतकरी दगडोबा देवराव वजीर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी बोरीच्या भारतीय स्टेट बँकेकडे कर्ज उपलब्ध होण्यासाठी एका पत्राद्वारे काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. बहुतांश शेतकरी जोड व्यवसायाकडे वळत असून दगडोजी वजीर यांनी दिलेल्या अर्जात म्हटले की, गेले अनेक दिवसापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न होत नसल्यामुळे मी हतबल झालो आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हेलिकॉप्टर घेऊन व्यवसाय करणे पसंत केले आहे. यासाठी बँकेने आपणास सहा कोटी ६७ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. कर्ज मंजूर केल्यास हेलिकॉप्टर खरेदी करून आपण तासाला ६५ हजार रुपये कमाई करू, असे अर्जात म्हटले आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीरपरभणी जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पेरणी केलेली आहे, परंतु पाऊस पडत नसल्याने पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. त्याने शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजास बसतोय. त्यामुळे बहुतांश शेतकरी जोड व्यवसायाकडे वळत असून दगडोबा वजीर यांनी चक्क जोड व्यवसाय म्हणून हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतला. पण त्यासाठी मोठी रक्कम लागत असल्याने त्यांनी बँकेकडे कर्जासाठी मागणी केली आहे.