परभणी: पालम तालुक्यातील शेख राजूर येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे नुकसान होऊनही राज्य शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेख राजूर येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पालम तालुक्यातील बहुतांश गावामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील पारवा येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने हे गाव अतिवृष्टी अनुदानामध्ये समाविष्ट केले; परंतु, पारवा येथून २ कि.मी. अंतरावर असलेल्या शेख राजूर येथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे मदतीपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देऊन शेख राजूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सदाशिव पवार, रंगनाथ कल्याणकर, प्रसाद आसले आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.