जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी पेरणी करतात. २०१९-२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहरलेल्या पिकातून यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके मातीमाेल झाली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले. त्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी नोंदविली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ९० कोटींची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षित केली होती. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला होता. मात्र, या विमा कंपनीने १८ हजार शेतकऱ्यांना केवळ ११ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ना विमा कंपनीने मदत केली ना शासनाने. त्यामुळे शेतकरी या वर्षाअखेरीस तरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात विक्रमी १०४ टक्के पाऊस
जिल्ह्यात यावर्षी जूनपासून सर्वसाधारण पाऊस होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत ९०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरला. तसेच जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी व जायकवाडी हे मुख्य प्रकल्प अनेक वषार्नंतर तुडुंब भरून वाहिले. ही एकमेव समाधानकारक बाब शेतकऱ्यांसाठी ठरली.