परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या जाहीर लिलाव, आडतीतही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे. १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाजार समितीच्या मार्केट यार्डात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र या शेतमालाला व्यापा-यांकडून हमीभाव देण्यात आला नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात असणा-या किरकोळ खरेदीदारांकडून शेतक-यांचा शेतीमाल कवडीमोल दराने खरेदी केला जात होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर पर्याय म्हणून जाहीर लिलावाच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरु केली. परंतु, या लिलावातही शेतक-यांना शासनाने ठरवून दिलेला ३ हजार ५० रुपयांचा हमीभाव व्यापा-यांकडून मिळाला नाही. त्यामुळे मार्केट यार्डात जाहीर लिलावावेळेस व्यापारी व शेतक-यांमध्ये अनेक वेळा खटके उडून जाहीर लिलाव बंद पाडण्यात आले. त्यानंतर व्यापारी व कृउबा समितीने यावर उपाय म्हणून जाहीर लिलाव बंद करुन आडतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, येथेही शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापा-यांनी जाहीर लिलाव व आडतीच्या माध्यमातून आॅक्टोबर महिन्यात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. परंतु, शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालामध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असणे, मालाला डाग आदी कारणाखाली प्रति क्विंटल केवळ २२०० ते २६०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या ३ हजार ५० रुपयांंच्या हमीभावाकडे व्यापा-यांनी चक्क पाठ फिरवली. यामध्ये शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन या पिकावर जेवढा खर्च केला होता, तेवढाही उत्पादनातून न निघाल्याने पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करताना व्यापा-यांकडून होणारी अडवणूक पाहून जिल्हा प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाने शेतक-यांचा माल हमीभाव दराने खरेदी करताना नमूद केलेल्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वैतागला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी केलेली उसणवारी फेडण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आपला माल खाजगी व्यापा-यांकडे विक्री करीत आहे. मात्र व्यापारीही या संधीचा फायदा घेत वाटेल त्या भावात सोयाबीनची खरेदी करीत आहेत.
७५३ शेतक-यांनीच केली नोंदणीशासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या अटी व नियमानुसार ज्या शेतक-यांना आपला शेतमाल हमीभाव केंद्रावर विक्री करावयाचा आहे. त्या शेतक-यांनी आधी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची जुळवाजुळव शेतक-यांना करावी लागत आहे. जिंतूर हमीभाव खरेदी केंद्रावर १९० शेतक-यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यानंतर मानवत २६०, परभणी १००, गंगाखेड १३, सेलू १८०, पूर्णा १० अशा एकूण ७५३ शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली आहे.
उत्पादनातही कमालीची घटयावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसावर जिल्ह्यातील शेतक-यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने नियोजन केलेल्या ५ लाख १६ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल २ लाख १७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. परंतु, मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जाग्यावरच करपली. तर काही भागात शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर ही पिके जगली. मात्र या पिकांच्या उता-यात यावर्षी चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. पेरणी करताना शेतक-यांनी केलेला खर्चही सोयाबीनच्या उत्पादनातून निघेनासा झाला आहे. त्यामुळे गतवर्षी सारखे याहीवर्षी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.