सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. एस. आरगडे यांना निवेदन देऊन केली आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना आशा आहेत. तसेच जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने विहीर, बोअरला पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाणी सोडले आहे. महावितरणकडून कृषी पंपाना एक आठवडा दिवसा आणि रात्री उलटून पालटून वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. कमालीची थंडी पडत आहे. तसेच रात्री साप, विंचू, रानडुक्कर आणि हिंस्त्र पशुचा वावर अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी पंपाना दिवसा योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, माजी सभापती रवींद्र डासाळकर, जिल्हा सचिव भागवत दळवे, रामप्रसाद पौळ, दगडोबा जोगदंड, जयसिंग शेळके, कपिल फुलारी आदींनी केली आहे.