परभणी : शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल होताच दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा सोयाबीनचा भाव एकदम ६ हजार रुपयांनी खाली आला आहे. त्यामुळे घटलेल्या दराने परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांच्या अपेक्षांची एक प्रकारे राखरांगोळीच झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत सोयाबीनचा भाव ११ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्ह्यात पेरणी झालेल्या २ लाख २४ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी अनेक अपेक्षा बाळगत पिकांवर भला मोठा खर्च केला. दरवर्षीपेक्षा या वर्षी परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी मोठी वाढ केली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सध्या बहरात आहे. तर काही ठिकाणी पिकाची काढणी झाली असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहे. ११ हजार रुपयांचा भाव मिळेल, या अपेक्षेने बाजारात आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.
उत्पादकांच्या हिताकडे कोण लक्ष देणार?
शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात येताच प्रति क्विंटल ६ हजार रुपयांनी भाव घसरले. गतवर्षीही शेतकऱ्यांकडून ३ ते ४ हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी करून तेच सोयाबीन व्यापाऱ्यांनी ८ ते १० हजार रुपयांनी विक्री केले. त्यामुळे उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी मध्यस्थींचा गतवर्षी फायदा झाला. त्यामुळे या वर्षीही ११ हजारांवर गेलेले सोयाबीन ५ हजार रुपयांनी खरेदी होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तेलाचे भाव मात्र जैसे थे
एकीकडे तेलाच्या भावात घसरण व डीओसीची मागणी घटल्याने सोयाबीनचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आज बाजारपेठेत प्रतिकिलो तेलाचा भाव १६४ रुपये जैसे थेच आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी देण्यात येणारे कारणही तकलादूच आहेत. त्यामुळे तेलाचे भाव जैसे थे असतानाच सोयाबीनचे भाव का काढले जात आहेत, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
तेलाच्या भावात झालेली घसरण व डीओसीची मागणी घटली असून, सोयाबीनमध्ये आर्द्रताही १८ ते २२ टक्क्यापर्यंत येत आहे. त्यामुळे सोयाबीन दरात घसरण झाली आहे. मात्र, गुरुवारी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलची खरेदी-विक्री झाली.
- मोतीशेठ जैन, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष
शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच भाव पाडण्यात आले. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कारणांमुळे भाव पाडले जात आहेत, त्याचा सोयाबीन खरेदी-विक्रीशी कोणताच संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे.
- माणिक कदम, शेतकरी