पूर्णा : तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बंधा-याचे काम मागील सात वर्षांपासून रखडलेले आहे.
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे. बंधा-याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडे केली. परंतु, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तीन वर्षानंतर पूर्णा नदीला मूबलक पाणी आले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी रबी हंगामाचे नियोजन केले आहे. परंतु, येथील बंधा-याचा काहीही उपयोग होत नाही.
अर्धवट उभारलेल्या बंधा-यामुळे पाणी वाहून जात आहे. परिसरातील निळा, कंठेश्वर, आजदापूर, महागाव आदी गावातील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मातीचा बांध टाकण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील माती गोळा करून बांध टाकण्यास सुरुवात केली. गुरुवारी बांधाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे वाहून जाणारे पाणी थांबले असून या पाण्यामुळे परिसरातील ४०० एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत होते.
७ वर्षापासून काम रखडलेले कंठेश्वर निळा येथे उभारण्यात येणा-या कोल्हापुरी बंधा-याची १ हजार २२२ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परिसरातील शेतकºयांनी नदीपात्रातील उभारलेल्या दरवाजाला माती टाकून पाणी अडविले आहे. दरम्यान, या बंधा-यासोबत मंजुरी मिळालेले राज्यातील इतर बंधा-याचे काम पूर्ण होऊन त्याचा वापरही सुरू झाला आहे. या बंधा-याला मात्र सात वर्षाचा कालावधी उलटला तरी काम रखडलेलेच आहे. त्यामुळे शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.