सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेकडो शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी आपल्या वाहनासह आठ- आठ दिवस रांगेत उभे आहेत. परिस्थितीचा फायदा घेऊन नव्याने कापूस खरेदीत उतरलेले खासगी व्यापारी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांचा बेभाव कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी कापूस यार्डात १३३४ वाहनांची नोंद झाली होती.
१९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरासह वालूर, देवगाव फाटा येथील एकूण ९ कापूस जिनिंगवर खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कापूस यार्ड परिसरात वाहनांची गर्दी झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील जिनिंगवर कापूस साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन पाच दिवस कापूस खरेदी बंद केली होती. परिणामी, पुन्हा वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यातच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सीसीआयकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे कापसाच्या वाहनांची अधिकच कोंडी वाढत आहे. सेलू तालुक्यासह इतर जिल्ह्यातून सेलूत कापूस विक्रीसाठी येत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. सीसीआयकडून दररोज १२ हजार ते १३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. खरेदी केलेला कापूस विविध जिनिंगवर पाठवला जातो. खरेदी केलेला कापसाची जिनिंग आणि विक्रीसाठी वाढलेला लोंढा याचा ताळमेळ बसत नसल्याने आठ- आठ दिवस कडाक्याच्या थंडीत शेतकरी वाहनासह कापूस यार्डात ताटकळत उभे आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी हेरून काही भांडवलदार व्यक्तींनी कापूस खरेदीत उडी घेतली आहे. शेतकऱ्यांकडून ५००० हजार रुपये क्विंटलने खरेदी करून तेच कापूस सीसीआयला ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटलने विक्री करून दररोज लाखोंचा नफा कमवत आहेत.
दोन्ही कापूस यार्ड फुल
शहरातील बाजार समितीचे दोन्ही कापूस यार्ड वाहनाने फुल झाले आहेत. त्यामुळे तहसील रोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी १३३४ वाहने उभे होती. दुपारपर्यंत २०० वाहने सोडण्यात आले होते. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांना वाहन खर्चाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून गारठ्यात रात्र काढावी लागत आहे. दरम्यान, कापसाची आवक लक्षात घेता कापूस जिनिंगची क्षमता वाढविणे गरजे झाले आहे.